भारतीय लष्कर जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन

भारतीय लष्कर सेवेत कार्यरत असलेल्या ४० वर्षीय जवानाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील सहा महिन्यापासून हे जवान घरी आलेले होते. त्यांना कार्यालयाकडून सेवेत रुजू होण्याकरिता पत्रव्यवहार सुरु होता. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नसून,पाचोरा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे.

नितीन दिलीप पाटील ( वय ४०,रा.जारगाव,ता. पाचोरा ) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. पाटील हे सन २००४ मध्ये भारतीय लष्करात भरती झाले होते. मागील चौदा वर्ष त्यांनी सेवेत खंड पडू दिलेला नाही. सुट्टीवर आल्यानंतर ते वेळेतच परत पोहचायचे ,परंतु यावेळी ते सुट्टीवर आल्यानंतर परत जाण्यास टाळाटाळ करत होते. आज (मंगळवारी) सकाळी त्यांच्या रूममध्ये ९ वाजण्याच्या दरम्यान त्यांनी गळफास घेतला. पाटील १० वाजले तरी उठले नसल्याने कुटुंबीयांनी दार वाजवले असता आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर खोली उघडून पाहिली असता पाटील यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. जवान नितीन पाटील यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.