मनसेची शिवतिर्थावर आज ‘राज’ गर्जना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं शिवतीर्थावर होणाऱ्या मेळाव्यासाठी मनसेचे कार्यकर्तेही सज्ज झालेत आणि शिवाजी पार्कही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्यावर्षी पक्षाच्या नव्याने सुरू झालेल्या या परंपरेत खंड पडला होता. आज पक्षाच्या भरभराटीची गुढी उभी करण्याकरिता राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कधीकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते असलेल्या राज ठाकरेंचा आज मोदींवरील विश्वास असेच चित्र आहे. मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर जाहीर भाषण असो वा व्यंगचित्रे ठाकरी फटकारे सुरूच आहेत.

लोकसभा निवडणुकीबरोबर राज्यात विधानसभा निवडणूकही होणार की काय असाही एक अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. या घडामोडींचा फायदा उचलण्याची राज ठाकरेंचीही इच्छा आहे. गुढीपाडवा मेळाव्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी शरद पवारांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली.त्यामुळे काल राजकीय चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे आज नव्या वर्षाच्या निमित्ताने राज ठाकरे काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.