राष्ट्रीय संशोधनात महाराष्ट्राचा झेंडा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन
पंजाब येथील चितकारा विद्यापीठात झालेल्या राष्ट्रीय संशोधन महोत्सवात महाराष्ट्राने आपली मोहोर उमटवली आहे. राज्याच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रीता नेगी या विद्यार्थिनीने या महोत्सवात प्रथम क्रमांक पटकावत राज्याची मान अभिमानाने उंचविली आहे. ती नाशिक येथील के. बी. एच. डेंटल महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.

अंबाला (पंजाब) येथील चितकारा विद्यापीठात संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात देशभरातून विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये प्रीताने यशस्वी कामगिरी करीत हे यश संपादन केले. प्रीताच्या या यशाबद्दल आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी नुकताच तिचे अभिनंदन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. संदीप गुंडरे, प्राचार्य संजय भावसार आदी मान्यवर उपस्थित होते.