‘लज्जा’ हेच मुळी ‘ती’ चं अवघड दुखणं

– इति पॅडमॅन
आता आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन सहज पॅडमॅनच्या शो ला जाऊन बसता येत. तो मुव्ही छानपैकी एन्जॉय देखील करता येतो. मासिक पाळीच्या पाच दिवसांत स्त्रीयांना होणाऱ्या वेदना, तिची कुचंबणा, हेटाळणी, हे सगळं विनोदाच्या फोडणीत मस्त समजून घेता येतं. पॅडमॅन बघत असताना आपण अद्यापही वैचारिक दृष्ट्या किती मागासलेले आहोत याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. या चित्रपटांत भलेही 2001 चा कालावधी विचारात घेतला असला तरीदेखील मानवी नैसर्गिक गोष्टींना जेव्हा धार्मिक अधिष्ठान दिले जाते त्यातून ‘तिची’ घुसमट फार परिणामकारकपणे या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॅडमन या दुसरा तिसरा कुणी नसून तो आपल्यातीलच आहे हे जेव्हा रसिकांच्या मनावर जितक्या ताकदीने दिग्दर्शक आर बालकी यांनी बिंबवले आहे याला तोड नाही.
पॅडमॅन मनावर ठसतो. त्याची छाप एक वेगळा परिणाम मनावर करून जाते. मासिक पाळी ही स्त्रीची नैसर्गिक गोष्ट. मात्र त्या नैसर्गिक गोष्टीला धर्म चिटकला, त्या धर्माच्या प्रभावातून लज्जेचा पदर बाईच्या डोक्यावर जो चिटकून बसला तो खाली पडायला बराच वेळ वाट पाहावी लागली. पॅडमॅन यासारख्या अशा अनेक गोष्टींवर तुटून पडतो. आपल्या विनोदी, खट्याळ स्वभावाने त्यावर मार्मिक भाष्य करतो. मध्यप्रदेशातील महेश्वर गावातील लक्ष्मीकांत (अक्षय कुमार) आणि त्याची पत्नी गायत्री(राधिका आपटे) यांची कथा. गायत्रीला पाळी येते तेव्हा तिला घराबाहेर बसवले जाते. सासू (ज्योती सुभाष) प्रचंड धार्मिक, लक्ष्मीकांतच्या घरात आणखी 2 बहिणी, त्यामुळे ‘त्या’ दिवसात स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या वेदनेवर काही उपाय करता येईल काय? असा विचार तो करतो. मला घराबाहेर बसवत आहेत तर बसू दे, आम्हा बायकांचा प्रश्न आहे हा, मलाच नव्हे तर सगळ्यांना यातून जावे लागते . गायत्रीच्या तोंडून अस ऐकायला मिळाल्यानंतर लक्ष्मीला या पाच दिवसांच्या वेदनेवर काही करायला हवं. अस मनोमन वाटू लागते. गायत्री सातत्याने त्याला आम्हा बायकांना लाजेस्तव काही बोलता येत नाही. जे काही आहे त्याबद्दल कुणाशी चर्चा देखील करता येत नाही. अस सांगते त्यावेळी लक्ष्मी आपणच आता यावर उपाय शोधला पाहिजे असा विचार करून कामाला लागतो. विशेष म्हणजे औषधाच्या दुकानातून आपल्या बायकोसाठी सॅनिटरी पॅड घेऊन येणाऱ्या लक्ष्मीला गायत्री चांगलेच सुनावते. काहीही झालं तरी तिला पॅड पेक्षा ती जुनी फडकीच त्यासाठी बरी वाटतात. लक्ष्मीला हे सगळं बोचत असते.

एका प्रसंगात दोघे नवराबायको हनुमानाच्या पाया पडण्यासाठी रांगेत उभे आहेत. हनुमानजींच्या हातात 51 रुपये ठेवले की त्यांचे तोंड उघडून त्यातून एक लाडूचा प्रसाद पुजारी त्या उभयतांच्या हातात ठेवतो. तुला 51 रुपये देऊन तुला या खोट्या हनुमानाच्या तोंडातून आलेला प्रसाद घ्यायला पैसे आहेत दुसरीकडे 55 रुपयांचे पॅड आणले तर ते जास्त महाग म्हणून परत करायला सांगते. “धर्म के बारे कुछ बोलूंगा तो धर्म धर्मेंदर होके मुझे मारेगा” लक्ष्मीच्या तोंडचा हा संवाद खूप काही सांगून जातो. मात्र सगळेच आलबेल होईल ते कसं? गावकऱ्यांना लक्ष्मीच्या भन्नाट प्रयोगाची माहिती कळते. बायको सोडून जाते. लक्ष्मी एकटा पडतो. गाव सोडून जातो.
पुढे दुसऱ्या शहरात परी वालिया (सोनम कपूर) च्या तबला वादनाचा चाललेला कार्यक्रम त्याचवेळी तिची झालेली नैसर्गिक अडचण. लक्ष्मीचे सातत्याने पॅडवरील प्रयोग करत राहणे, त्यावेळी त्या तबलावादकाच्या मदतीला त्याचे धावून जाणे, हे सारं आपल्याला फार प्रभावित करून जाते. पारी देखील स्वताच्या एमबीए कौशल्याचा उपयोग लक्ष्मीच्या प्रयत्नांना योग्य दिशा देऊन करते. हे सगळं रसिकांनी एकवार पडद्यावर जरूर बघावे. लक्ष्मीचा संघर्ष, त्याचे प्रयत्न, अदम्य जिद्द सगळ्यांच्या टीकेला आपल्या कामातून उत्तर देणारा लक्ष्मी मनात घर करून जातो. नकळत आपण त्याला टाळ्या वाजवून दाद देऊ लागतो.

बेबी, रुस्तुम, एअरलिफ्ट, अक्षयकुमारच्या या चित्रपटातील भूमिका रसिकांच्या पसंतीस पडल्या होत्या. सध्या गेल्या काही वर्षांपासून चरित्र चित्रपटांची मोठी लाट आली असली तरी त्यात आशय, अभिनय, दिग्दर्शन या पातळीवर मोजकेच चित्रपट यशस्वी झाले आहेत. अक्षय कुमारच्या पॅडमॅन चित्रपटाचे नाव त्यात आता घ्यावे लागेल. सहज सुंदर , हलका फुलका अभिनय करून त्याने सर्वांना चकित केले आहे. नीरजा या चित्रपटातील भूमिकेमुळे वेगळी ओळख मिळालेल्या सोनम कपूर ने देखील आपल्या वाट्याला आलेल्या कामाचे सोने केले आहे. राधिका आपटे हिचा अभिनय देखील लक्षवेधी आहे. मुद्राभिनय, हावभाव, त्यातून तिने प्रभावीपणे व्यक्त केलेल्या आपल्या मनातील भावना रसिकांच्या पसंतीस उतरतात.

आर बालकी म्हटल्यावर त्याची कलाकृती पाहण्यासाठी चित्रपटगृहाची वाट धरावी, यापूर्वी त्याने चिनी कम, पा, शमिताभ यासारखे वेगळ्या धाटणीचे सिनेमा देणाऱ्या बालकीने वास्तव जीवनातल्या कोईमतूरच्या अरूंनाचलन मुरुगंथनंम या पॅडमॅनला केलेला सलाम पाहवाच.”औरत की सबसे बडी बिमारी शरम है” हे बोल लक्ष्मी गायत्रीला ऐकवतो. या संवादाचा अर्थ जाणून घेण्यासाठी पॅडमॅन बघायला काहीच हरकत नाही.

 

डॉल्फिन भाऊ
साडेतीन स्टार ***