लष्करातील जवानाकडून युवतीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

लग्नाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार करून नंतर लग्नास नकार देत मित्रांकरवी युवतीस गोचिड मारण्याचे विषारी औषध पाजुन तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात लष्करी जवानासह इतर दोघांविरूध्द खुनाच्या प्रयत्नासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास बाळासाहेब नरसिंगे (रा. देवरगाव, ता. चांदवड, जि. नाशिक), सचिन रामचंद्र निलाखे (रा. महादेवनगर, मांजरी रोड, हडपसर) आणि बाबुराव (पुर्ण नाव माहित नाही. रा. देवरगाव, ता. चांदवड, जि. नाशिक) यांच्याविरूध्द भादवि ३०७, ३७६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ वर्षीय पिडीत युवतीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत युवती सन २०१६ मध्ये पुण्यात रहावयास होती. ती एका खासगी ठिकाणी काम करीत होती. तिची आरोपी विकास याच्यासाहेब ओळख होती. विकासने तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि जुलै २०१६ मध्ये तिच्यावर कात्रज परिसरात एका खोलीत बलात्कार केला. त्यानंतर आरोपी विकासने पिडीत युवतीला शिर्डी येथे वेळोवेळी नेले आणि तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. दि. १ मार्च २०१८ रोजी लग्नाच्या कारणावरून पिडीत युवती आणि आरोपी विकास यांच्यामध्ये भांडणे झाली. विकास हा लष्करात कामाला आहे. त्याने पिडीतेसोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी विकासचे मित्र सचिन निलाखे आणि बाबुराव यांनी पिडीत युवतीला बळजबरीने गोचिड मारण्याचे विषारी औषध पाजुन तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती पिडीत युवतीने तात्काळ शिर्डी पोलिस ठाण्यात दिली. शिर्डी पोलिसांनी आरोपींविरूध्द खुनाच्या प्रयत्नासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सर्वप्रथम गुन्हा हा कात्रज परिसरात घडल्याने शिर्डी पोलिसांनी गुन्हयाच्या अधिक तपासासाठी गुन्हा हा भारती विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग केला. पिडीत युवतीने शिर्डी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत आरोपी हा लष्करात कामाला असल्याचे नमुद केले आहे. पिडीत युवती ही मुळची अहमदनगर जिल्हयातील आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक एस.पी. यादव अधिक तपास करीत आहेत.