लॉजमध्ये चालणा-या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

वाळवा तालुक्यातील आष्टा येथील इस्लामपूर रस्त्यावर असणा-या एका लॉजवर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी लॉज मालकासह तिघांना अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी रात्री सिद्धी लॉजवर करण्यात आली.

याप्रकरणी लॉजचा मालक सचिन हरिश्‍चंद्र माने (वय 38, रा. लक्ष्मीबाई नायकवडीनगर), व्यवस्थापक तुकाराम पांडुरंग गावडे (वय 30, रा. चव्हाण कॉलनी), रूमबॉय छोटू जंबाजी पेटारे (वय 23, रा. आनंद कॉलनी, आष्टा) यांना अटक कऱण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्ट्यातील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाल्याने शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील अन्य लॉजवरही अशी बेकायदा कृत्ये चालत असल्याची चर्चा  आहे.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी वेश्या व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलिस निरीक्षक राजन माने यांना आष्ट्यातील सिद्धी लॉजवर अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती खबर्‍याद्वारे मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. शनिवारी रात्री उशीरा पथकाने सिद्धी लॉजवर छापा टाकला. त्यावेळी वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. त्यानंतर तीनही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिल्पा यमगेकर, भगवान नाडगे, विकास पाटणकर, लता गावडे, कविता पाटील, स्नेहल मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.