शेतकऱ्याकडून लाच घेताना महावितरणाच्या अभियंताला अटक

उस्मानाबाद: पोलिसनामा ऑनलाईन
देशातील बळिराजाच्या मागे लागलेले नष्टर अजून संपले नाही. दुष्काळ, नापिकी, शेतमालाचे पडलेले भाव यातून मार्ग काढतानाच नाकीनाऊ येते. यात
आता लाचखोर अधिकाऱ्यांची देखील भर पडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात लाचखोरीने उग्ररूप धारण केले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेतकऱ्यांकडून एक लाख रुपयांची लाच घेताना महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यासह दोन जणांना रंगेहात पकडले आहे. सरकारची धोरणं आणि अस्मानी संकटाने पिचलेल्या शेतकऱ्याची शासकीय पातळीवर सुरू असलेली पिळवणूक या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणचा सहाय्यक अभियंता सुधीर बुरनापल्ले, वरिष्ठ तंत्रज्ञ सरदार खान पठाण व खासगी इलेक्ट्रिकल गुत्तेदार पांडुरंग जाधव या तिघांना अटक करण्यात आली आहे. शेतातील रोहित्र दुरुस्त करून बसविण्यासाठी या तिघांनी पीडित शेतकऱ्याकडे लाच मागणी केली होती.

तुळजापूर तालुक्यातील होर्टी गावात एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात विंधन विहीर होती. मात्र, ते रोहित्र नादुरुस्त असल्याने मागील सहा महिन्यांपासून विंधन विहीर बंद होती. यामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान होत होते, त्यामुळे रोहित्र दुरुस्त करणे गरजेचे होते. मात्र, ते दुरुस्त करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चक्क दीड लाख रुपयांची मागणी केली.अखेर या मागणीला वैतागून शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावला आणि एक लाख रुपयांचा पहिला हप्ता या तिघांना देण्याचा बनाव रचण्यात आला. लाचेचा हा हप्ता मुरूम मोड येथे स्विकारताना पोलिसांनी या तिघांना अटक केली. या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.