सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणू शकते पण : सुमित्रा महाजन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
”मी मोदी सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणण्यास कर्तव्यबद्ध आहे. मात्र, सभागृहात याबाबतचा आदेश दिला जात नाही, तोपर्यंत मोदी सरकारविरोधात कोणत्याही प्रकारे अविश्वासदर्शक ठराव आणता येऊ शकत नाही,” असे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितले.

केंद्र सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडण्यात यावा, याबाबतची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. या मागणीसाठी विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सभागृहाचे कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले होते. त्यानंतर आज सुमित्रा महाजन यांनी यावर आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ”मी केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणण्यास कर्तव्यबद्ध आहे. मात्र,सभागृहात याबाबतचा आदेश दिला जात नाही. त्यामुळे तोपर्यंत मोदी सरकारविरोधात कोणत्याही प्रकारे अविश्वासदर्शक ठराव आणता येऊ शकत नाही”.

दरम्यान, राज्यसभेतील काही सदस्यांचा खासदारकीचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना निरोप देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केलेल्या भाषणानंतर राज्यसभेचे कामकाज आज (बुधवार) थांबविण्यात आले. तसेच विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या सततच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे कामकाज 2 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले.