… म्हणून चोरट्यांनी शेतकर्‍याच्या घरातून चोरलं 100 किलो ‘शेण’

रायपूर : वृत्त संस्था – छत्तीसगढ सरकारने शेणासंबंधीच्या योजनेची घोषणा करताच राज्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे एका शेतकर्‍याच्या घरातून चोरांनी सुमारे 100 किलो शेण चोरले आहे.

द न्यू इंडिया एक्प्रेससच्या एका रिपोर्टनुसार, कोरिया जिल्ह्यातील एका गावात दोन शेतकर्‍यांनी एका वाड्यात एकत्र करून ठेवलेले सुमारे शंभर किलो शेण चोरांनी चोरून नेले आहे. शेतकरी जेव्हा सकाळी उठून त्यांच्या वाड्यात गेले तेव्हा शेणाचा मोठा ढीग गायब होता.

शेणाची चोरी झाल्याचे पाहून शेतकरी हैराण झाले. त्यांनी यासंदर्भात स्थानिक समितीसह पोलीस ठाण्यातही तक्रार केली. शेतकर्‍यांचे म्हणणे आहे की, शेण चोरी होण्याची ही नवी समस्या आहे. ती रोखण्यासाठी चोरांना पकडणे आवश्यक आहे.

छत्तीसगढमध्ये भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने गोधन न्याय योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सरकार पशुपालकांकडून शेण खरेदी करेल, ज्याचे त्यांना पैसेही दिले जातील.

या योजनेंतर्गत सरकार पशुपालकांकडून 2 रुपये प्रति किलो दराने शेण खरेदी करेल. सरकारचे म्हणणे आहे की, जर पाशुपालकाला सेंटरमध्ये जाऊन शेण विकायचे नसेल तर तो घरातून सुद्धा विकू शकतो आणि वाहतूक भाडे कापून त्याला पैसे दिले जातील.