तामिळनाडूत पोलिसांच्या गोळीबारात ११ ठार

चेन्नई : वृत्तसंस्ठा

तामिळनाडुमधील तूतीकोरीन शहरात तांब्याच्या प्रकल्पाविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाने हिंसक वळ घेतले असून आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात ११ जणांचा मृत्यु झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

तामिळनाडुच्या तूतीकोरीन शहरात वेदांता ग्रुपचा स्टारलाईट कॉपर कारखाना आहे़ या कारखान्यातून सोडण्यात येणा-या दुषित पाणी आणि वायूमुळे हवा आणि पाण्याचे गंभीर प्रदुषण होत आहे. शहरातील प्रत्येक घरामध्ये दोन जण आजारी असतात. लोकांना श्वसन, त्वचा आणि ह्दयाचे आजार झाले आहेत. या प्रकल्पाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर या प्रकल्पाविरोधात आंदोलनाने पुन्हा जोर धरला आहे.

आंदोलन सुरु असताना मंगळवारी त्याला हिंसक वळण लागले़ आंदोलनकांनी गाड्यांची तोडफोड करीत जाळपोळही केली़ पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या़ त्यानंतर आंदोलक अधिकच आक्रमक बनले़ त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला़ त्यात ११ जणांचा मृत्यु झाले असून त्याचे पडसाद संपूर्ण तामिळनाडुत उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सर्वत्र जमावबंदीचा आदेश लागू केला आहे़

तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा-दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तर जखमींना प्रत्येकी तीन लाख रुपये दिले जाणार आहेत.

राहुल गांधींचे ट्वीट
पोलिसांच्या कारवाईत अकरा जणांचा मृत्यू झाल्यामुळे राजकारण तापलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तामिळनाडूमधील राज्य सरकारवर टीका केली. पोलिसांच्या कारवाईत अकरा जणांचा मृत्यू होणं हे राज्य पुरस्कृत दहशतवादाचं उदाहरण आहे, असं ट्वीट त्यांनी केलं. तर तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते एमके स्टॅलिन यांनी राज्याच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली.