धक्कादायक ! 12 वर्षीय चिमुरड्याने धाकट्या भावाची गळा चिरून केली हत्या, सातारा जिल्ह्यात प्रचंड खळबळ

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  एका 8 वर्षाच्या चिमुकल्याची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अवघ्या चार तासात हत्येचा छडा लावला आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी 12 वर्षाच्या मृताच्या भावाला ताब्यात घेतले आहे. आरोपी मुलाने लहान भावाच्या हत्येचे सांगितलेले कारण ऐकून पोलीस चक्रावून गेले आहेत. आई आणि वडील दोघंही लहान भावावरचं अधिक प्रेम करतात. धाकटा माझ्यावर सतत लक्ष वॉच ठेवतो. काहीही चूक झाली तर सगळे मलाच ओरडतात. याच रागातून त्याने घरात कोणीही नसताना लहान भावाची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत चिमुरड्याचे आई-वडील मुळचे कर्नाटकातील रहिवासी असून ते सध्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे एका शेतीवर मजूर म्हणून काम करतात. आई आणि वडील दोघेही दिवसभर शेतात कामाला जातात. तर दोन्ही भाऊ घरीच असतात. सोमवारीही आई -वडील नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. त्यावळी मुले घरीच खेळत होती. पण सायंकाळी घरी परत आल्यानंतर आई- वडिलांना केवळ त्याचा मोठा मुलगाच दिसला. त्याला लहान भाऊ कुठे आहे? असे विचारला असता त्याने मला माहिती नाही, असे उत्तर दिले. बराच वेळ होऊनही मुलगा आला नाही. त्यामुळे चिंतातूर पालकांनी त्याला आसपासच्या परिसरात शोधायला सुरुवात केली. यावेळी घराजवळील पपईच्या बागेत लहान मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आई- वडिलांना दिसले. घटनेची माहिती मिळताच फलटण पोलीस घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहाणी करताना त्यांना हत्येसाठी वापरलेली कु-हाड सापडली. हत्येची चौकशी करत असताना पोलिसांना 12 वर्षाच्या मोठ्या भावावर संशय आला. त्याची चौकशी करताना तो उलटसुलट उत्तर देऊ लागला. पण पोलिसांनी त्यांचे कौशल्य वापरून चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिली.