स्वतःच्या ड्रायव्हरनेच अपहरण करून उकळले 14 लाख

पुणे ः पोलीसनामा ऑनलाईन

स्वतःच्या ड्रायव्हरनेच अपहरण करून साथीदारांच्या मदतीने 14 लाख 30 हजाराच खंडणी उकळल्याची घटना समोर आली असून शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त पंकज डहाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विजय श्रीहरी नवघणे (26, रा. मु.पो. खामगाव मावळ, खरमरीवाडी, ता. हवेली), उत्‍तम मारूती भामे (28, रा. मु.पो. गोर्‍हे खु., ता. हवेली), गौतम वसंत कांबळे (32, रा. मु.पो. गोर्‍हे खु., ता. हवेली), प्रदिप चंद्रकांत वाघ (30, रा. मु. सांबारेवाडी, पो. खानापुर, ता. हवेली) आणि विशाल कैलास शेलार (34, रा. मु.पो. गोर्‍हे खु., ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कन्स्ट्रक्शन टोटल इनवॉर्टमेंट या कंपनीचे मॅनेजर राहुल मनोहर कटकमवार (37, रा. सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी विजय नवघणे हा कटकमवार यांच्या कारचा ड्रायव्हर आहे. दि. 22 मे रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कटकमवार हे बी.टी. कवेडे रोडवरून कारने जात असताना दोन मोटारसायकलवरून आलेल्या चोघांनी त्यांना अडविले. त्यांना पिस्तुलचा धाक दाखुन त्यांचे कारसह अपहरण केले. तेथुन त्यांना कात्रज घाटात नेण्यात आले. पिस्तुलाचा धाक दाखवुन कटकमवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. जवळपास 7 तास कटकमवार यांना जबरदस्तीने डांबुन ठेवण्यात आले. त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. आरोपींनी कटकमवार यांच्याकडून एकुण 14 लाख 30 हजार रूपयाची खंडणी उकळली. दरम्यान, पैसे घेतल्यानंतर आरोपी हे कात्रज चौकात आले. त्यावेळी तेथे पोलिसांनी त्यांना हटकले. त्यावेळी आरोपींनी त्या दोन पोलिस कर्मचार्‍यांना 2 लाख 40 हजार रूपये दिले. आरोपी कटकमवार यांना घेवुन बावधन परिसरात आले. त्यांनी दि. 23 मे रोजी त्यांना दम देवुन सोडून दिले. फिर्यादी हे घाबरलेले असल्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार दिली नाही. त्यानंतर काही दिवसानंतर हे प्रकरण उघडकीस आले आणि त्या दोन पोलिस कर्मचार्‍यांवर डॉ. प्रविण मुंडे यांनी निलंबनाची कारवाई केली.

फिर्यादींनी दि. 25 मे रोजी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असता फिर्यादीच्या ड्रायव्हरचा त्यांच्या अपहरण आणि खंडणी प्रकरणातील सहभाग समोर आली. पोलिसांनी वेगवेगळया पध्दतीने तपास करून आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून 3 लाख 84 हजार, 5 मोबाईल हॅन्डसेट, बनावट पिस्तुल आणि मोटारसायकली तसेच त्या पोलिसांना दिलेले 2 लाख 40 हजार रूपये असा एकुण 6 लाख 92 हजार 150 रूपयाचा ऐवज जप्‍त केला. गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्‍त प्रदीप देशपांडे, उपायुक्‍त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्‍त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-5 चे पोलिस निरीक्षक दत्‍ता चव्हाण, सहाय्यक निरीक्षक युवराज नोंद, उपनिरीक्षक अकिल शेख, सहाय्यक उपनिरीक्षक लक्ष्मण शिंदे, पोलिस हवालदार संतोष मोहिते, प्रदीप सुर्वे, प्रविण शिंदे, भरत रणसिंग, माणिक पवार, अमजद पठाण, केरबा गलांडे, सिध्दराम कोळी, सचिन घोलप, पोलिस नाईक महेश वाघमारे, गणेश बाजारे, प्रविण काळभोर, अंकुश जोगदंडे, प्रमोद घाडगे, महिला कर्मचारी स्नेहल जाधव आणि चालक संजय दळवी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.