सावधान ! 15 वर्षांपेक्षा जुन्या गाड्या ठेवणे पडेल 8 पट महाग; ऑक्टोबरपासून बदलतील ‘हे’ नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमच्याकडे १५ वर्ष जुनी कार अथवा इतर कोणतेही वाहन असल्यास त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे. ऑक्टोबरपासून अशा मोटारांच्या आरसी नूतनीकरणासाठी ८ पट अधिक पैसे द्यावे लागतील. ऑक्टोबरपासून तुम्हाला RC रिन्यूअलसाठी ५००० रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर बाईकच्या रिन्यूअलसाठी तुम्हाला सध्याच्या ३०० रुपयांऐवजी १००० रुपये द्यावे लागतील. याचा सर्वाधिक फटका बस आणि ट्रक चालकांना बसणार आहे. १५ वर्ष जुन्या बस अथवा ट्रकसाठी दुरुस्तीचे रिन्यूअल प्रमाणपत्र मिळवणे त्यांच्यासाठी २१ पट महाग असेल. आता यासाठी त्यांना १२,५०० रुपये द्यावे लागतात.

रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने या वाढीसंदर्भात मसुदा अधिसूचना जरी केला आहे. वाहन स्क्रॅपिंग पॉलिसी अंतर्गत हे बदल केले जात आहेत. या प्रस्तावानुसार वाहन नोंदणीच्या रिन्यूअलसाठी उशीर झाल्यामुळे दरमहा ३०० ते ५०० रुपये दंड भरावा लागेल. दुसरीकडे व्यावसायिक वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिरंगाई झाल्यास दिवसाला ५० रुपये दंड आकारला जाईल.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार, १ एप्रिल २०२२ पासून सरकारी विभागांना त्यांच्या १५ वर्ष जुन्या वाहनांच्या नोंदणीचे रिन्यूअल करणे शक्य होणार नाही. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने अंतिम निर्णय घेतल्यास ही यंत्रणा देशभर राबविला जाईल. मंजुरीनंतर नवीन नियम सर्व सरकारी वाहनांना लागू होतील. यात केंद्र आणि राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, पीएसयू, नगरपालिका आणि सर्व स्वायत्त संस्थांची वाहने समाविष्ट आहेत. त्यानंतर १ एप्रिल २०२२ पासून सरकारी विभाग १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांच्या नोंदणीचे करू शकणार नाहीत.