गुलमोहोर रस्त्यावरील 16 कच्ची दुकाने पाडली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – गुलमोहोर रस्ता परिसरात असलेली १६ कच्ची दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज दुपारी ही कारवाई केली.

सावेडी उपनगर परिसरातील गुलमोहर रस्त्यावर उभारण्यात आलेली पत्र्याच्या शेडची १६ कच्चा दुकानांचे अतिक्रमण आहे. अनेक वर्षांपासून सदर जागेचा वाद न्यायालयात चालू होता. सदर अतिक्रमणांवर कारवाई करण्यात महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून दिरंगाई केली जात होती. सदर अतिक्रमणे पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. तरीही सदर कारवाई करण्यास विलंब केला जात होता. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिकाही झाली होती.

अखेर आज दुपारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखालील अतिक्रमण विरोधी पथकाने सदर १६ पत्र्याच्या शेडची कच्ची दुकाने जमीनदोस्त केली.