ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने बीडमध्ये 2 रुग्णांचा मृत्यू, भाजप नेत्या पंकजा मुंडेनी केली ‘ही’ मागणी

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. असे असतानाच बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन कोरोना बाधित रुग्णांचा ऑक्सिजनचा पुरवठा अचानक खंडित झाल्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चौकशीची मागणी केली आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, बीड जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड 7 मध्ये उपचार घेत असलेले 2 कोरोनाबाधित रुग्ण पहाटे दगावले. अचानक ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने देखील या घटनेला दुजोरा दिला आहे. हा प्रकार अतिशय दुर्दैवी असून चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. दरम्यान 3 दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता. मात्र, हे आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळून लावले होते.