‘त्या’ २०० तरुणांना हातून गेलेल्या नोकऱ्या मिळणार परत

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातील सुमारे २०० तरुणांना टपाल खात्यातील त्यांच्या नोकऱ्या परत मिळणार आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांतील निवड झालेल्या या विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे त्यांच्या नोकऱ्या परत मिळणार आहेत. टपाल खात्यातील नियुक्त्यांसाठी रीतसर निवड होऊनही ऐनवेळी अन्याय पद्धतीने त्यांच्याकडून नोकऱ्या हिसकावून घेण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातील पोस्टमन/ मेलगार्डची १,७०१ व ‘मल्टि टास्किंग स्टाफ’ची (एमटीएस) ७३३ पदे भरण्यासाठी सन २०१६ मध्ये लेखी परीक्षा घेऊन सर्व निवडप्रक्रिया पूर्ण झाल्यावर मार्च २०१६ मध्ये २,४३४ यशस्वी उमेदवारांची यादी टपाल खात्याने जाहीर केली होती. यात १६८० जणांची पोस्टमन म्हणून तर २१ जणांची मेलगार्ड म्हणून निवड करण्यात आली होती.

यामुळे, औरंगाबाद, बुलढाणा, मुंबई, अहमदनगर, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, नांदेड, जळगाव, पुणे, लातूर, परभणी, उस्मानाबाद, वाशिम, नाशिक, हिंगोली, अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांमधील जवळपास १९१ तरुणांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात आठ याचिका दाखल केल्या होत्या. खंडपीठाने या याचिका मंजूर करून या विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला आणि या सर्वांना त्यांच्या नोकऱ्या परत मिळतील असा आदेश दिला. याचिका करणाऱ्यांमध्ये १९१ तरुण असे होते की ज्यांची निवड झाली होती पण त्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. टपालखात्याने या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या नव्हत्या. मात्र त्यात एकूण ४.५० लाखांहून अधिक उमेदवारांपैकी फक्त २३३ उमेदवारांच्या बाबतीत त्यांनी परीक्षेत गैरप्रकार केल्याचा संशय घेण्यासारखी परिस्थिती आढळली होती.

दरम्यान, अमित डोंगरे (औसा, लातूर) आणि अण्णासाहेब शिवाजी माळी (धानुरी, उस्मानाबाद) हे दोन याचिकाकर्ते असे होते की, ज्यांना नियुक्तीपत्रे मिळून ते कामावर रुजूही झालेले होते. त्यांच्याबाबतीत देखील न्यायालयाने शहानिशा करायला सांगून त्यांच्या सहभाग न आढळल्यास त्यांना आजपर्यंतचा ५० टक्के पगार देण्यात यावा, असे आदेश दिले आहेत.