जळगावमध्ये सांगली पॅटर्न ? भाजपचे 27 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला !

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये खिंडार पडले आहे. महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीला चार दिवस शिल्लक असताना महापालिकेत राजकीय भूकंप झाला आहे. जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. भाजपचे 57 पैकी 27 हून अधिक नगरसेवक भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला असून, भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या गोटात सामील झाले असून, त्यांना रविवारी सायंकाळी सहलीला पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपच्या काही बंडखोर नगरसेवकांनी मुंबईचा रस्ता धरलेला आहे. या सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, सुरेश दादा जैन यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. जळगाव महापालिकेत महापौरपद भाजपकडे आहे. मात्र, 57 पैकी 27 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याने भाजपच्या हातून जळगाव महापालिका जाणार आहे. त्यामुळे भाजपचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाजन हे अडचणीत आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपकडून व्हीप बजावण्यापूर्वीच हे नगरसेवक बेपत्ता झाले आहेत.

शिवसेनेकडून त्यांच्या नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आले असून, महापौर पदासाठी जयश्री महाजन यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. जळगाव महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असून, महापौर व उपमहापौर पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या 17 मार्च रोजी संपणार आहे, तर 18 मार्च रोजी महापौर व उपमहापौर पदांची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

महापालिकेतील बलाबल

भाजप -57
शिवसेना -15
एमआयएम – 3