गलवान खोरे जेथे चीनने केले भेकड कृत्य, 1962 मध्ये सुद्धा येथेच दिला होता धोका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत आणि चीनी लष्कराच्यामध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान हिंसक संघर्ष झाला आहे, ज्यामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले. ही घटना गलवान खोर्‍यातील आहे, जेथे 1962 च्या युद्धात सुद्धा चीनने भारताचा विश्वासघात केला होता.

गलवान खोरे लडाखचे क्षेत्र आहे. येथे गालवान नदी सुद्धा वाहते. 1962 च्या युद्धात सुद्धा गलवान खोर्‍यात भारत-चीनी सैनिकांमध्ये युद्ध झाले होते. वादग्रस्त क्षेत्रात छावण्या टाकणे हे मागील अनेक वर्षांपासून चीनचे लष्कर म्हणजेच पीपल्स लिब्रेशन आर्मी (पीएलए) च्या रणनितीचा भाग राहीला आहे. याच ठिकाणी पुन्हा असे करण्यास भारतीय लष्कराने रोखले असता मागील काही दिवसांपूर्वी सुद्धा संघर्ष झाला होता.

58 वर्षांपूर्वी याच खोर्‍यात भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले होते, आज पुन्हा येथेच दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या खोर्‍यात नदीच्या जवळ तंबू उभारल्याने भारत आणि चीन सीमेवर तणावाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. एक भारतीय अधिकारी आणि 2 जवानांच्या मृत्यूनंतर सीमेवरील तणाव आणखी वाढला आहे.

मागील काही दिवसात दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांची चर्चा सुरू होती, परंतु कोणताही मार्ग निघाला नाही.

चीनी मीडियाने भारतावर घुसखोरी आणि चीनच्या सीमेत अनधिकृत पद्धतीने संरक्षण सुविधा स्थापन करण्याचा आरोप केला होता, ज्यामध्ये काहीही तथ्य नव्हते. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने म्हटले की, चीनचे सैनिक या भागात तंबू ठोकून आम्हाला भडकावण्यासाठी हालचाली करत होते.

यापूर्वी 5-6 मे रोजी चीनचे सैनिक लडाखच्या पँगोंग त्सो तलावाच्या जवळ भारतीय जवानांशी भिडले होते. या घटनेनंतर भारत आणि चीन सीमेच्या त्या भागात सुरक्षा कडेकोट करण्यात आली, येथी जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे.