मलेशियात 300 भारतीय मुले अडकली, सर्वाधिक मराठी मुलांचा समावेश

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारतात परतण्यासाठी विमान उपलब्ध नसल्याने 300 मुले विमानतळावरच अडकली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक मराठी मुलांचा समावेश आहे. सर्व जण फिलिपाइन्सला उच्च शिक्षणासाठी गेल होते. ते मलेशियामधील क्वालालंपूर विमानतळावर अडकून पडली आहेत. भारतात माघारी जायचे कसे असा प्रश्न त्यांना पडला आहे.

कोरोना व्हायसचा विळखा वाढल्याने अनेक देशांनी हवाई उड्डाणावर बंदी घातली आहे. त्यामुळे देश-विदेशातील नागरिक अडकून बसले आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी गेलेले अडकल्यामुळे त्यांचे कुटूंबिय भीतीखाली आहेत. मलेशियात अडकलेल्या मराठी मुलांपैकी एक शर्वरी कुंभार हिचे वडील सुदाम कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती खूप भीतीदायक आहे. मुलांना अजून कोणतीही मदत मिळाली नसून हेल्पलाइन देण्यात आलेली नाही. त्यांना आणण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. मुलीने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक ठिकाणी चेक अप झालेले आहे. पुढे काय होईल याबद्दल अद्याप काही सांगण्यात आले नाही.