वाळूचे बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या ठेकेदाराला ४ कोटीचा दंड

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील प्रवरा नदीपात्रातून बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या वाळू ठेकेदाराला तहसीलदारांनी ४ कोटी ५७ लाख ९७ हजार ६२५ रुपयांचा ठोठावलेला दंड जिल्हा न्यायालयाने कायम ठेवला आहे.

वाळूठेकेदार पवन पोपटराव कडू (रा़ सात्रळ) याने २०१० मध्ये सात्रळ येथील प्रवरा नदीपात्रातील ५ हजार ९०० ब्रास वाळूउपसा करण्याचा लिलाव घेतला होता. मात्र, पवन कडू याने ताबा देण्यापूर्वीच बेकायदेशीररित्या ६ हजार २५ ब्रास वाळूचे उत्खनन करुन वाहतुक केली.  याप्रकरणी राहुरी येथील तत्कालीन तहसिलदार अमित सानप यांनी पंचनामा करून ठेकेदार कडू याला २३ सप्टेंबर २०१० साली  ४ कोटी ५७ लाख ९७ हजार ६२५ रूपयांचा दंड ठोठावला होता.

या निर्णयाविरोधात कडू याने दिवाणी न्यायालयात तहसिलदार यांच्या विरुद्ध दावा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने तहसीलदार यांनी दिलेला आदेश ठेकेदारावर बंधनकारक नाही असा निर्णय दिला होता.

दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकारच्यावतीने अहमदनगर जिल्हा न्यायालयात दाद मागितली होती. जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. माने यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणात सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले. सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दिवाणी न्यायालयाने दिलेला आदेश रद्द करून ठेकेदाराला तहसीलदारांनी केलेला दंड कायम ठेवला आहे. या निकालामुळे ठेकेदार पवन कडू याला दंडाची रक्कम भरावी लागणार आहे.