Nagpur News : खेळता-खेळता स्वयंपाकघरात गेली अन् सोडला जीव

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – एमआयडीसी परिसरातील भीमनगर येथे दुर्दैवी अशी घटना समोर आली आहे. आंघोळीसाठी पाणी गरम करत असताना चार वर्षीय चिमुकली खेळताना उकळत्या पाण्याच्या भांड्यावर पडली. त्यात भाजून चिमुकलीचा अंत झाला. सोनाक्षी सुनील उईके, असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, हिंगणा रोडवरील भीमनगर भागात सुनील मोहनलाल उईके हे आपल्या कुटूंबासोबत राहतात. ३ जानेवारीस त्यांच्या पत्नीने शेगडीवर गरम पाणी करण्यासाठी ठेवले होते. त्यांची चार वर्षीय मुलगी सोनाक्षी घरात खेळत होती. खेळताना ती शेगडीजवळ आली आणि खिडकीत असलेली खेळणी काढण्यासाठी ती प्लॅस्टिकच्या डब्यावर चढली. तेव्हा तिचा पाय घसरला.

पाय घसरल्यानंतर ती थेट उकळत्या पाण्याच्या भांड्यावर पडली. त्यात सोनाक्षी होरपळली. पडल्याचा आवाज एकूण तिच्या आईने घरात धाव घेतली. त्यानंतर सोनाक्षीला लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, १० जानेवारीस उचारादरम्यान सोनाक्षीचा अंत झाला. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.