कश्मीरच्या पूँछ, राजौरी जिल्ह्यात उभारले जाणार आणखी ४०० बंकर

जम्मू-काश्मीर : वृत्तसंस्था – लष्कराने शनिवारी अतिरिक्त ४०० बंकर उभारण्यासाठी परवनगी दिली आहे. हे बंकर पूँछ आणि राजौरी या दोन जिल्हयात उभारले जाणार आहेत. या दोन्ही जिल्हयात पाच दिवसांपासून पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात तोफगोळ्यांचे मारे होत आहेत. त्यामुळे गनिमी काव्याचा वापर करण्यासाठी पूँछ आणि राजौरी जिल्हयात प्रत्येकी २०० बंकर बांधण्यात येणार आहेत.

सीमेपलीकडून सातत्याने होणाऱ्या गोळीबाराला आणि तोफगोळ्यांना रोखण्यासाठी उपाय म्हणून पूँछ आणि राजौरी जिल्हयात बंकर उभारण्याला परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भात अधिकृत माहिती सरकारच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरच्या ग्रामविकास विभागाला या बंकर बांधण्या संदर्भातील निधी दिला जाणार आहे. तसेच लष्करच्या देखरेखीत बंकर बांधण्याचे काम केले जाणार आहे. दरम्यान हे बंकर तातडीने उभारण्यात यावे असे प्रशासनाच्या वतीने निर्देश देण्यात आले आहेत.

सीमे पलीकडून पाकिस्तानचे सैन्य भारताच्या दिशेने नेहमी गोळीबार करत असते अशा वेळी सैन्याला गोळीबाराचा प्रतिकार करण्यासाठी या बंकरचा आधार घेता येतो. तसेच नव्याने बांधण्यात येणाऱ्या बंकरचा उपयोग सीमे लगत असणाऱ्या गावातील नागरिकांना गोळीबारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी देखील केला जाणार आहे. नव्याने बांधण्यात येणारे बंकर हे येत्या महिन्याभरात बांधून पूर्ण केले जातील असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.