पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील 404 सेवेकर्‍यांना ‘कोरोना’ची लागण

पोलिसनामा ऑनलाईन – देशातील नावाजलेल्या पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिरात काम करणार्‍या तब्बल 404 जणांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे, अशी माहिती श्री जगन्नाथ मंदिराचे प्रशासक अजय जेना यांनी दिली. तिरूपती देवस्थानातील अनेक कर्मचार्‍यांनाही याआधीच कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे आता मंदीरातील सेवेकर्‍यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

जगन्नाथ मंदिरातील पूजाअर्चा सुरु असून सध्या कुणीही सेवेकरी उपस्थित नाहीत. कोरोनामुळे जगन्नाथ मंदिर मार्चपासून बंद ठेवण्यात आले होते.कोरोना झालेले सर्व जण घरी विलगीकरणात असून पूजाविधीची माहिती असलेले फार कमी लोक असल्याने त्यांची अनुपस्थिती जाणवत आहे. बलभद्र, देवी सुभद्रा, जगन्नाथ यांच्या पुजेसाठी किमान 13 पुजारी लागतात. त्यामुळे सेवेकरी व पुजारी मिळून रोज 39 जणांची गरज असते. जगन्नाथाच्या रुपात येथे विष्णूची पूजा केली जाते. पुरीचे मंदिर वेगळे असून तेथे सकाळपासून रात्रीपर्यंत पूजा विधी चालू असतात. एक पूजाविधी केला नाही तर दुसरा करता येत नाही असे जगन्नाथ संस्कृतीचे अभ्यासक भास्कर मिश्रा यांनी सांगितले. आणखी सेवेकरी व पुजारी कोरोनाग्रस्त झाले तर अडचण निर्माण होणार आहे त्यामुळे प्रशासन कनिष्ठ पुजारी व सेवेकर्‍यांची व्यवस्था करण्याच्या विचारात आहे. पुरी जिल्ह्यात कोरोनाचे 1 हजार 255 रुग्ण असून आतापर्यंत 52 बळी गेले आहेत.