घरफोडी, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील ५ आरोपी गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या ५ आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ५ ने अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील १ लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. युनिट ५ च्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यात ४ तर जबरी चोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली आहे.

काळेवाडीकडे जाणाऱ्या ओव्हर ब्रिजवर मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेलेले ड़ॉ. अभिजीत शहा यांना तीन जणांनी धमकावून महागडा मोबाईल चोरून नेला होता. गुन्हे शाखा युनिट ५ आणि सायबर सेलच्या पथकाने समांतर तपास करून आरोपींना अटक केली. गौतम उर्फ दादा दिपक कदम याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने त्याच्या अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे उघड झाले. तसेच अल्पवयीन मुलांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी चिंचवड आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून चार गुन्हे उघडकीस आले असून गुन्ह्यातील ४६ हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

गुन्हे शाखेने घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये गजानन उर्फ गजा उर्फ शिवा भगवान पवार याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने संजय उर्फ पप्या उर्फ ब्लेड पप्या आण्णासाहेब पवार याच्या मदतीने देहूरोड येथील दुकानामध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ७२ हजार रुपये किंमतीचे पाच मोबाईल जप्त केले आहेत.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, सायबर सेलचे पोलीस उप निरीक्षक निलेश बोडके, पोलीस कर्मचारी, मयुर वाडकर, फारुक मुल्ला, संदिप ठाकरे, धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, ज्ञानेश्वर गाडेकर, दत्तात्रय बनसुडे, भरत माने, दयानंद खेडकर, श्यामसुंदर गुट्टे, राजकुमार इघारे, दयानंद भोसले, अतुल लोखंडे, भास्कर भारती, नाजुका हुलावले यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त