फडणवीसांची सोशल मिडियावर बदनामी, 5 जणांवर FIR दाखल

नाशिकः पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आलेल्या माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह, भाषेचा वापर असलेला व्हिडीओ तयार करून फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी 5 संशयितांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत नाशिकरोड भाजप मंडळ अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी शनिवारी पोलिसांत तक्रार दिली होती. रतन खालकर, संकेत भोसले, प्रमोद कोहंकडे, राहुल जोशी आणि बंटी ठाकरे आदीनी त्यांच्या फेसबुक अकाऊंट वरून हा व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप या तक्रारीत केला होता. त्यानुसार 5 जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार गिरीश महाजन, जयकुमार रावल, खासदार डॉ भारती पवार, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, महापौर सतीश कुलकर्णी आदी शुक्रवारी नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी मी शहरात राहिलो असतो तर तुम्हाला बघून घेतले असते, अशा शब्दात संकेत भोसले याने महाजन यांना उद्देशून स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून हा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केला.

त्यात फडणवीस यांनाही मारण्याची धमकी दिल्याचे गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. फडणवीस, महाजन नेत्यांविषयी शिवराळ भाषेत आणि बदनामी करणारा व्हिडीओ प्रसारित केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर भाजपच्या पदाधिका-यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देत संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यानुसार 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास शेळके तपास करत आहेत.