आजीबाईंच्या धाडसाला सलाम … ! चक्क ट्रेनमधून पडल्यानंतरही चोरांशी केले दोन हात 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

ही बातमी आहे एका ५८ वर्षाच्या आजींची … त्यांच्या धाडसाची. आपली बॅग हिसकावून पळणाऱ्या चोराशी लढताना या आजीबाई ट्रेनमधून पडल्या पण तरी देखील चोराचा पाठलाग सोडला नाही. ही घटना मुंबईतील मस्जीद आणि सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान घडली. प्रतिभा त्रिपाठी असे या धाडसी आजीबाईंचे नाव आहे. जखमी आजींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण या आजींच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोल्हापुरात घोडागाडी स्पर्धेदरम्यान थरार : ‘तो’ मरता मरता वाचला

अंधेरीत राहणाऱ्या त्रिपाठी उद्यान  एक्सप्रेसमधून बंगळुरू येथे बहिणीकडे निघाल्या होत्या. सीएसएमटी स्थानकावरून २२ ऑगस्टला त्यांनी ट्रेन पकडली. बहीणीशी फोनवरून बोलल्यावर त्यांनी फोन त्यांच्या हँडबॅगेत ठेवला. ट्रेन सुरू झाली तेव्हा डब्यात चढलेल्या चोराने त्यांच्याकडून बॅग हिसकावून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. ट्रेनचा वेग कमी होता. त्रिपाठी आजी काही बॅग सोडेनात. बॅगसोबतच ओढत ओढत चोराने त्यांना दारापाशी आणले. त्याने उडी मारली त्याबरोबर बॅगसह त्रिपाठी आजीदेखील ट्रेनमधून खाली पडल्या. त्यांच्या उजव्या खांद्याला, कमरेला फ्रॅक्चर झाले आहे. हाताच्या तळव्यावरही जखम झाली. त्या पडल्या त्यामुळे त्यांची बॅगवरची पकड सैल झाली आणि चोर बॅग घेऊन पसार झाला.

[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ded9501a-aa96-11e8-9a55-2f1fd6f35f1e’]
जखमी आजींनी त्याचवेळी कर्जतच्या दिशेने जात असलेल्या ट्रेनच्या मोटरमनला हात दाखवून थांबवले. त्याने त्यांना डब्यात घेतले. भायखळ्याच्या स्टेशन मास्टरांशी संपर्क साधला आणि आजींना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी दिली. चोराला जीआरपींनी रविवारी पकडले. मुकद्दर इदरसी असे त्याचे नाव आहे. बॅगेत काही सोनं, रोख आणि मोबाईल फोन होता.त्रिपाठी आजी पहिल्यांदाच एकटीने प्रवास करत होत्या. त्यांनी ट्रेनने न जाता विमानाने जावे यासाठी त्यांचे कुटुंबीय त्यांच्या मागे लागले होते. पण त्या ऐकल्या नाहीत. आता त्यांना दोन महिने अंथरुणावरच राहावे लागणार आहे. ‘गेली ३० वर्षे ती कधीही रुग्णालयात दाखल झालेली नाही. पण ती धाडसी आहे. लवकर हार मानत नाही. चोराला पकडल्याचं सांगितलं, तेव्हाही म्हणाली की त्याला मारू नका, फक्त त्याने एका म्हातारीचे काय हाल केले ते त्याला कळलं पाहिजे,’ असं त्रिपाठी यांचा मुलगा वरुण याने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं.