ग्राहकराजा सावधान…! चॅनल न निवडल्यास १ फेब्रुवारीपासून टीव्ही बंद ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जितके चॅनल तितकेच पैसे असा ग्राहक हिताचा निर्णय टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) ने घेतल्यानंतर ही नवी व्यवस्था लागू होण्यास केवळ ८ दिवस उरले आहेत. येत्या १ फेब्रुवारीपासून नव्या योजनेची आमलबजावणी होणार आहे. पण सुमारे १६ कोटी ५० लाख डायरेक्ट टू होम (डीटीएच) आणि केबल ग्राहकांपैकी तब्बल ६५ % ग्राहकांनी आपल्या आवडत्या चॅनल्सची यादीच बनवलेली नाही. नव्या व्यवस्थेबाबत आपल्या ग्राहकांना माहिती द्यावी यासाठी ट्रायने डीटीएच आणि केबल चालकांवर दबाव टाकलेला असतानाही, ही परिस्थिती देशभरात पाहायला मिळत आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी ट्राय कडून नवी वेबसाईट
ग्राहकांना आपले आवडते फ्री टू एअर आणि निर्धारित किंमतीच्या टीव्ही चॅनल्सची यादी तयार करण्यात मदत व्हावी यासाठी ट्रायने channel.trai.gov.in नावाची एक वेबसाइट लाँच केली आहे. या वेबसाईटवर ग्राहक आपल्या आवडीच्या टीव्ही चॅनल्सची यादी तयार करू शकणार आहेत. इथे त्यांना अनेक चांगले पर्याय देखील उपलब्ध असणार आहेत. मात्र, सध्या या वेबसाइटमध्ये पॅकेज खरेदी करण्याची कोणतीही व्यवस्था नाही.

वेबसाइटद्वारे पॅकेज खरेदी करण्याची व्यवस्था निर्माण करण्यावर ट्राय विचार करत आहे. ग्राहकांना आपल्या डीटीएच आणि केबल ऑपरेटरना पॅकेज खरेदीची ऑर्डरही याच वेबसाईटच्या माध्यमातून देता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत पॅकेज तयार करून ते खरेदी करण्याला वेग येईल, असा विश्वास ट्रायने व्यक्त केला आहे. मात्र ३१ जानेवारीपर्यंत ज्यांनी पॅकेज तयार केले नसेल अशा ग्राहकांना ब्लॅकआऊट केले जाणार नाही, अशी माहिती ट्रायचे सल्लागार अरविंद कुमार यांनी दिली आहे. ज्या लोकांनी पॅकेज तयार केले नसेल, अशा लोकांना त्यांचे डीटीएच आणि केबल ऑपरेटर १०० फ्री टू एअरचे पॅकेज स्वत: देतील, असेही अरविंद कुमार म्हणाले. यासाठी ग्राहकांना जीएसटीसह १५४.५० रुपये द्यावे लागणार आहेत. ग्राहकांच्या मदतीसाठी ०१२०६८९८६८९ हा ट्रायचा टोल फ्री क्रमांकही देण्यात आला आहे.

मासिक बिल होणार कमी : ट्राय अधिकारी
डीटीएच आणि केबल कनेक्शनचे मासिक बिल निश्चितच कमी होईल असे ट्रायचे चेअरमन आर. एस. शर्मा म्हणाले. जीटीव्ही चॅनल्स आपण पाहतो, त्यांची निवड करावी आणि अनावश्यक चॅनल्स यादीतून काढून टाकावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे. सर्वसाधारणपणे एक कुटुंब ३० ते ४० टीव्ही चॅनल्स पाहते. आता ग्राहक स्वत:च आपले चॅनल्स निवडणार असल्याने ते मासिक बिलाबाबत जागरुक राहतील, असे ट्रायचे सेक्रेटरी एस. के. गुप्ता यांनी म्हटले आहे.