Corona Vaccination : कोरोनाची लस घेतल्यानंतर मुंबईतील 65 वर्षीय वृद्धाचा ICU मध्ये मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना लस घेतल्यानंतर काही लोकांना त्याचे परिणाम जाणवत आहेत. ठाणे, भिवंडीमधील २ जणांचा कोरोना लस घेतल्यामुळे मृत्यू झाला आहे. अशीच घटना गोरेगावमध्येदेखील घडली आहे. गोरेगावमध्ये एका ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीने कोरोना लस घेतल्यानंतर अवघ्या दीड तासात त्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोरोना लस बनविणाऱ्या कंपन्यांकडून आणि सरकारकडून कोरोना लस सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत आहे.

१ मार्चपासून ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना ही लस देण्यास सुरुवात झाली आहे. या लसीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून राज्यातील नेते शरद पवार, सुप्रिया सुळे यांनीदेखील कोरोना लस टोचून घेतली आहे. यानंतर अनेक नागरिकांनी कोरोना लस टोचून घेण्यास पुढाकार घेतला आहे. या लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी करण्यात येत आहे. मात्र, यामध्ये मृत्यूच्या अनेक घटना समोर आल्यामुळे अनेकजण धास्तावले आहेत.

गोरेगाव येथील ६५ वर्षांच्या व्यक्तीने सोमवारी जोगेश्वरीच्या मिल्लत नर्सिंग होममध्ये कोरोनाची लस घेतली. मात्र, लस घेतल्यानंतर काही वेळातच ते खूर्चीवरून कोसळले. त्यानंतर त्यांना लगेच आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. मात्र, या व्यक्तीने लस घेतल्यानंतर अवघ्या दीड तासातच त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईमधील हे पहिलेच प्रकरण आहे. महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून या व्यक्तीचा मृत्यू हा कोरोना लसीमुळे झाल्याचे नाकारले आहे. जोगेश्वरीच्या लसीकरण केंद्रामध्ये दुपारी ३.३७ वाजता या वृद्धाला लस टोचण्यात आली.

लसीकरणानंतर काही वेळातच त्या व्यक्तीला चक्कर आली आणि ते खुर्चीतून खाली कोसळले. त्यांना सीरमच्या कोविशिल्ड लशीचा ०.५ मिलीचा डोस दिला गेला होता. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित विकार असे गंभीर आजार होते, असे मुंबई पालिकेकडून सांगण्यात आले आहे.पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी कोरोना लस दिल्यानंतर अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक बसल्याचे सध्या सांगता येणार नाही. लसीकरण समिती (एईएफआय) या घटनेची चौकशी करेल, त्यानंतरच काही सांगता येईल अशी माहिती दिली आहे. या वृद्धाचे आयसीयूमध्ये सायंकाळी ५ वाजता निधन झाले.

देशभरात ४० घटना
कोरोना लस दिल्यानंतर देशभरात मृत्यूच्या ४० घटना घडल्या आहेत. ही संख्या लसीकरणाच्या संख्येपेक्षा खूपच कमी आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये अनेकांना दुर्धर आजार होते. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये एकाचाही मृत्यू हा कोरोना लसीमुळे झाला नाही, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात भिवंडीमधील ४० वर्षांच्या आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर मृत्यू झाला होता.