Oxygen टँकर रस्ता चुकला अन् 7 रुग्णांचा मृत्यू झाला, हैदराबादमध्ये प्रचंड खळबळ

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन, इंजेक्शन, बेडचा तुटवडा जाणवत आहेत. ऑक्सिजनचा अभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशी परिस्थिती असताना हैदराबादमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑक्सिजन टँकर रस्ता चुकल्याने 7 कोरोनाग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला आहे. किंग कोटी रुग्णालयात ही घटना घडली आहे. ऑक्सिजन मिळण्यास उशीर झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील किंग कोटी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील 7 रुग्णांची प्रकृती गंभीर होती. त्यांना तात्काळ ऑक्सिजनची गरज होती. मात्र ऑक्सिजनचा दाब कमी प्रमाणात झाल्याने रुग्णांनी प्राण सोडला. रुग्णालयाने ऑक्सिजन टँकमधून कमी दाबाने पुरवठा होत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे ऑक्सिजनची व्यवस्थाही केली होती. मात्र हा टँक भरण्यासाठी निघालेला टँकर रस्ता चुकला अन् ऑक्सिजन अभावी 7 जणांचा मृत्यू झाला. नारयानगुडा पोलिसांनी देखील रस्ता चुकलेल्या टँकरला रस्ता दाखवण्यासाठी प्रयत्नही केले. मात्र टँकर येईपर्यंत बराच उशीर झाला होता. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. टँकरला येण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर का तयार केला नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.