आ. नितेश राणेंच्या कार्यपद्धतीला वैतागल्यानं शिवसेनेत प्रवेश करणार 7 समर्थक !

वैभववाडी : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे आमदार नितेश राणे यांना त्यांच्याच समर्थकांनी जोर का धक्का देत शिवसेनेची वाट धरली आहे. वैभववाडीतील 9 राणे समर्थक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी नगरपंचायतमधील 7 राणे समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनाप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. कालपर्यंत नितेश राणे त्यांच्या कुटुंबावर दबाव टाकत होते असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे. 7 जणांसह माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचाही समावेश आहे.

सतीश सावंत म्हणाले, नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीला गेल्या 5 वर्षांपासून आम्ही कंटाळलो होतो. त्यामुळं 7 नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष असे मिळून एकूण 9 जण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गेल्या 5 वर्षात नितेश राणे यांनी जी काही आश्वासनं दिली होती ती पूर्ण केली नाहीत. त्यांची कार्यपद्धती चुकीची होती. नगरपरिषद ही पहिल्यांदाच झाली होती. पण तिची विकास नितेश राणे करू शकले नाहीत अशी टीकाही त्यांनी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी ओरस पडवे येथे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या लाईफ टाईम मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी आले होते. शाह यांच्या दौऱ्याच्या दोनच दिवसात 7 समर्थकांनी राणेंची साथ सोडणं हा नितेश राणेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.