आठ हजार कोटींच्या मनी लॉन्डरिंगचे नगर कनेक्शन !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील डी. बी. मार्ग पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील तब्बल आठ हजार रुपये कोटींच्या मनी लॉंडरिंग प्रकरणात अहमदनगर कनेक्शन चौकशीतून पुढे आले आहे. ‘ईडी’च्या कोठडीत असलेला मच्छिंद्र खाडे हा जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील रहिवाशी आहे. त्याने मूळच्या नगरच्या रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटीत नागपूर शाखा व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. तेथे असतानाच तो मध्य भारतातील सर्वात मोठा हवाला व्यापारी जयेश हवालावाला यांच्या संपर्कात आला होता, अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.

खाडे याने काही दिवस रेणुकामाता मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी काम केलेले असल्यामुळे संस्थेचे चेअरमन प्रशांत भालेराव यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन खाडे याचा रेणुकामाता मल्टीस्टेटशी कसलाही संबंध नाही, असा बचाव केला आहे.

‘ईडी’ने योगेश्वर डायमंड प्रायव्हेट लिमिटेड, मे. श्री चारभुजा डायमंड प्रायव्हेट लिमिटेड व मे. कनिका जेम्स प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध मनीलॉड्रिंग अ‍ॅक्टअन्वये गुन्हा दाखल केला आहे. अनिल चोखरा, संजय जैन (माजी संचालक रघुकुल डायमंड्स) व हाँगकाँग येथील मे स्कायलाइट आणि लिंक फै कंपनीचे संचालक सौरभ पंडित यांना अटक केली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान खाडे यांच्या मध्यस्थीने बँकिंग हवाला झाल्याचे स्पष्ट होताच ‘ईडी’ ने शुक्रवारी त्यांना अटक केली होती. या कंपन्या विदेशात हिऱ्यांची आयात निर्यात करतात. या कंपन्यांच्या संपर्कात असलेला जयेश हा हवालाचा पैसा बँकिंग हवालामार्फत खाडे च्या मदतीने विदेशात पाठवत होता, अशी माहिती चौकशीतून पुढे आली आहे. तब्बल 8 हजार कोटी रुपये परदेशात पाठवले होते, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

खाडे हा पतसंस्थेतील कामकाज आटोपल्यानंतर जयेश हवालावाला याला भेटत होता. जयेश हा खाडे याच्या मदतीने बँकिंग क्षेत्रातील कमकुवत ग्राहकांच्या खात्याचा वापर करून ‘आरटीजीएस’ द्वारे बाहेरील देशात पैसे पाठवत होता, असे चौकशीतून पुढे आले. त्यामुळे खाडे यालाही ‘ईडी’ ने ताब्यात घेतले आहे. सध्या तो कोठडीत आहे. नागपूर येथील बँकेच्या शाखांचा वापर करून हे मनीलॉड्रिंग झाले आहे.

कारवाईशी संबंध नाही : रेणुकामाता मल्टीस्टेट

मनी लॉन्डरिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केलेले माजी नागपूर शाखा व्यवस्थापक मच्छिंद्र खाडे आणि श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा नागपूर शाखेपुरता मर्यादित संबंध २०१२-१३ या आर्थिक वर्षात ४/७/१२ ते ६/१०/१३ अशा पंधरा महिन्यांसाठी आलेला होता. त्यांनी ६/१०/१३ रोजी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारांशी रेणुका माता मल्टीस्टेट चा कसलाही संबंध नाही, असा खुलासा संस्थेचे चेअरमन प्रशांत भालेराव यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

ज्या आर्थिक वर्षात खाडे नागपूर शाखेत कार्यरत होता, त्या १२/१३ या वर्षाचे, नागपूर शाखेचे ताळेबंदपत्रक २ कोटी ५८ लाख रुपयांचे होते. संस्थेला परदेशात पैसे पाठवण्यासाठी केंद्र सरकारची परवानगीच नसल्यामुळे आरटीजीएस किंवा एनईएफटी द्वारा होंगकोंग येथील बँकेला पैसे पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.