नाशिक येथे होणारे अखिल भारतीय साहित्य संमेलन स्थगित !

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिक येथे होणारे ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन स्थगित ठेवण्याचा निर्णय साहित्य महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

औरंगाबाद येथे आज सकाळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती दिली. ठाले पाटील यांनी सांगितले की, राज्यभरात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्यभरातून संमेलनासाठी येणार्‍या साहित्य प्रेमींमुळे आणखी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यामुळे संमेलन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरातील वेगवेगळ्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. नाशिक संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचे ठाले पाटील यांनी सांगितले.

जर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तर पुढे साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा विचार करण्यात येणार आहे. साहित्य संमेलनाला येणार्‍या साहित्यिक हे बहुसंख्येने ६० वर्षांच्या पुढचे आहेत. नियोजित अध्यक्षांसह अशा साहित्यिकांना गर्दीमध्ये सहभागी करण्याचा अट्टाहास का असा प्रश्न काही साहित्यिकांनी उपस्थित केला होता.