१६ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याने, जवानांचे प्राण वाचविण्यासाठी तयार केले असे काही..

वृत्तसंस्था : उरी सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या सिनेमामधील ‘हाऊस द जोश?’ या संवादाने तर सध्या अनेक नेते मंडळींच्या भाषणाची सुरुवात होते. या सिनेमातील आणखीन एक चर्चेची गोष्टी ठरली ती म्हणजे ‘गरुड’ हे आगळेवेगळे ड्रोन. या सिनेमामध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे या पक्षासारख्या दिसणाऱ्या ड्रोनचा उपयोग हेरगिरीसाठी करण्यात आला. मात्र आता खरोखरच एका १६ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याने अशाप्रकारचा ड्रोन तयार केला आहे. विशेष म्हणजे हा ड्रोन हेरगिरीऐवजी भूसुरुंगांची जागा ओळखून ते नष्ट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

अहमदाबादमधील हर्षवर्धन सिन्हा झाला या १६ वर्षीय विद्यार्थ्याने तयार केलेल्या या ड्रोनला ‘इगल ए सेव्हन’ हे नाव दिले आहे. हर्षवर्धन सिन्हा हा वयाच्या दहाव्या वर्षांपासून वेगवेगळी स्मार्ट गॅजेट्स बनवतो. रोबोटिक्सची आवड असणाऱ्या हर्षवर्धन सिन्हने ‘अॅरोबॉटिक्स सेव्हन’ नावाच्या कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून जीवन अधिक सोपे करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल असं हर्षवर्धन सिन्हा सांगतो.

आपल्या या नवीन भूसुरुंग शोधून काढणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाबद्दल बोलताना तो म्हणतो, ‘सध्या अशाप्रकारचे तंत्रज्ञान कुठेच उपलब्ध नाही. भारतीय लष्कर आपल्या छावणीमधून रिमोटच्या सहाय्याने हे ड्रोन ऑपरेट करु शकेल. या ड्रोनच्या मदतीने लष्कराला भूसुरुंग शोधून काढून ते निकामी करणे सहज शक्य होईल. या ड्रोनला भूसुरुंग सापडला की तो छावणीमधील अधिकाऱ्यांना संदेश पाठवेल. त्यानंतर तेथील अधिकाऱ्यांना या ड्रोनवरील कॅमेरातून तो भूसुरुंग छावणीतील ऑप्रेटरला पाहता येईल. तसेच हा भूसुरुंग या ड्रोनच्या मदतीने कोणत्याही व्यक्तीच्या मदतीशिवाय लगेच निकामी करता येईल.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार हर्षवर्धन सिन्हाच्या या संशोधनाला परदेशातून मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली आहे. मात्र हर्षवर्धन सिन्हाने ती ऑफर नाकारली असून आपल्याला हे तंत्रज्ञान केवळ भारतीय लष्कराला पुरवायचे असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

परदेशातील ऑफर्सबद्दल बोलताना हर्षवर्धनसिन्हा म्हणतो, ‘दक्षिण कोरिया, अमेरिका, फ्रान्स, दुबई आणि थायलंड यासारख्या देशांमधील कंपन्यांनी मला पार्टनरशिपची ऑफर दिली होती. आम्ही तेथे येऊन कंपनी सुरु करावी असं त्या कंपन्यांनी आम्हाला सांगितले होते. कंपनी स्थापन करण्यासाठी आर्थिक मदत पुरवण्यात येईल असंही या कंपन्यांनी सांगितले.’ इतक्या साऱ्या ऑफर्स येऊनही हर्षवर्धन सिन्हाच्या कंपनीने त्या सर्व नाकारल्या आहेत. ‘आपल्या देशात भूसुरुंगाचा स्फोट झाल्याने अनेक जवान शहीद होतात. त्यामुळेच मला भारतीय लष्कर आणि सीआरपीएफ सारख्या सुरक्षादलासाठी हे तंत्रज्ञान आणखीन विकसित करायचे असल्याने मी परदेशातील ऑफर नाकारल्या आहेत’ असं या नकारामागील कारण स्पष्ट करताना हर्षवर्धन सिन्हाने सांगितले.