लग्नसमारंभात खुनाचा थरार, सपासप वार करुन आचाऱ्याचा खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – उपराजधानी असलेल्या नागपूरात (Nagpur) गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरु असून शुक्रवारी (25) एका लग्नसमारंभात (Wedding) दोघांनी एका तरुणावर सपासप वार करुन खून (Murder) केला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून तरुणाला वाचवण्यासाठी गेलेल्या मित्रावर देखील हल्लेखोरांनी वार करून गंभीर जखमी केले आहे. ही घटना शहरातील हुडकेश्वर पिपळा फाट्याजवळ डांगे लॉन्समध्ये (lawns) रात्री दहाच्या सुमारास घडली.

अखलेश मिश्रा (वय-31) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र ओम मिश्रा (वय-21) हा हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील डांगे लॉन्समध्ये लग्न सोहळा सुरु होता. मृत अखलेश आणि जखमी ओम मिश्रा हे दोघेही लग्न सोहळ्यात कॅटरर्समध्ये आचारीचे काम करत होते. स्वयंपाक सुरु असताना अचानक धारदार शस्त्र घेऊन हल्लेखोर लग्नसमारंभात घुसले. ते थेट स्वयंपाक खोलीत गेले. त्यांनी अखलेशवर सपासप वार केले. अखलेशला वाचवण्यासाठी ओम पुढे आला असता त्याच्यावरही वार केले. अखलेशचा जागीच मृत्यू झाला तर ओम गंभीर जखमी झाला. यानंतर हल्लेखोर लग्न सोहळ्यातून पसार झाले. भर लग्नसमारंभात खुनाचा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पैशाच्या वादातून खून
मयत अखलेशचा कॅटरिंगच्या पैशाच्या वादातून खून करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती हुडकेश्वर पोलिसांनी दिली. पुढील तपास हुडकेश्वर पोलीस करीत आहेत.