लाच म्हणून दोन किलो मटण बिर्याणी मागणारा मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

अहमदनगरः पोलीसनामा आॅनालाईन

जमीनीच्या खरेदीप्रकरणी 14 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंडलाधिकाऱ्याला रंगेहाथ अटक केली आहे. उल्हासराव कावडे (वय-57) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. एेवढेच नव्हे तर लाचेच्या पैशा बरोबरच दोन किलो मटण बिर्याणी देखील मागीतल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे अहमदनगर महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. तसेच मटण बिर्याणीच्या अजब मागणीमुळे परिसरात चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील मंडलाधिकारी उल्हासराव कावडे याने लाच मागितली होती. तक्रारदाराने नवीन जमिनीचा व्यावहार केला होता. खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर स्वतःचे नावे लावण्यासाठी आणि जमीन खरेदी खताच्या नोंदणीसाठी ते मंडलाधिकारी कावडे यांच्याकडे गेले होते. यावेळी कावडे यांनी या कामाच्या मोबदल्यात तक्रारदाराला 14 हजार रुपये रोख व दोन किलो मटण बिर्याणीची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विबागाकडे तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीची खातरजमा केल्यानंतर सापळा लावला असता एसीबीच्या पथकाने बुधवारी (दि.13) रोजी कावडे यांना 14 हजाराची लाच स्वीकारताना अटक केली. लाच घेतल्या प्रकरणी कावडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.