रस्त्यावर वाढदिवस साजरा केल्यामुळे १६ जणांवर गुन्हा दाखल

तासगाव : पोलीसनामा आॅनलाइन – शहरातील सांगलीनाका परिसर या भागात रस्त्यात रहदारीस अडथळा निर्माण करून वाढदिवस साजरा करणाऱ्या हुल्लडबाजी विरोधात तासगाव पोलिसांनी आक्रमक कारवाई करत 16 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हवालदार सागर जाधव यांनी पांडुरंग खोत सह अन्य १५ जणांविरोधात फिर्याद दिली आहे.

दरम्यान या पुढील काळात रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांचा प्रसाद मिळेल असा इशारा पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर यांनी दिला. तर नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले.

याबाबत तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शहरात सांगली नाका परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने पेट्रोलिंग करणारे हवालदार सागर जाधव, ढ़ामसे, व मासाळ यांच्या ध्यानात आले. वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना सांगली नाक्याच्या रस्त्याच्या मध्यभागी मोटरसायकल उभा करून त्याच्यावर केक ठेवून त्याचबरोबर रस्त्यावर फटाक्याची माळ ठेवून संपूर्ण अडथळा करून पांडुरंग खोत व अन्य पंधरा जण वाढदिवस साजरा करीत असल्याचे त्यांच्या ध्यानात आले.

पोलिसांना पाहताच हे सर्वजण पळून गेले. त्यानंतर त्यांच्या विरोधात जाधव यांनी फिर्याद दिली. तासगाव शहर तसेच तालुक्यात रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याचे फॅड वाढत आहे. रस्त्यावर बॅनर लावत फाळकूट दादा व गल्लीचे स्वयंघोषित पुढारी यांचा यात समावेश आहे. यापूर्वी पोलिसांनी रात्री वाढदिवस साजरा करण्यावर गुन्हा दाखल करताना सत्ताधारी गटाचे नगरसेवक दिसून आले होते.

तासगाव शहरात ही दुसरी घटना घडली आहे. सामान्य लोकांना त्रास होईल अशाप्रकारे रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस समारंभ करणाऱ्यांना कायद्याचा हिसका दाखवण्याचा इशारा पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर यांनी दिला आहे. त्याचबरोबर त्यांना कोण बोलवते त्यांच्यावरही कारवाही करणार असल्याचे सांगितले.

अशाप्रकारे हुल्लडबाजी करण्याची माहिती 02346/240100 या नंबरवर कळविण्याचे आवाहन केले आहे. माहिती सांगणार्याचे नाव गुप्त राखले जाईल असे बनकर म्हणाले. दरम्यान अशाप्रकारे सार्वजनिक उपद्रवाला वैतागलेल्या तासगावकर यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. पोलिसांनी सातत्याने अशी कारवाई करण्याची मागणी होत आहे.

इमानदार रिक्षाचालकाने प्रवाशाचे हजारों रुपये केले परत, पोलीसांकडून सत्कार