भारत सरकारचा मोठा निर्णय ! ‘BSNL ला चीनी उपकरणांवरील अवलंबन कमी करण्यास सांगितले

नवी दिल्ली : गलवान खोर्‍यात भारतीय आणि चीनी सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. या घटनेनंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने देशात 4जी च्या कार्यप्रणालीत वापरल्या जाणार्‍या चीनी उपकरणांच्या वापरावर प्रतिबंध आणला आहे. यासाठी सरकारने दूरसंचार विभाग आणि सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएल आणि एमटीएनएलला सुद्धा निर्देश दिले आहेत. देशात सध्या चीनी वस्तूंवरील बहिष्कार तीव्र झाला आहे.

याशिवाय खासगी कंपन्यांच्या ऑपरेटर्सना सुद्धा हे निर्देश देण्यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत, जेणेकरून चीनच्या उपकरणांवरील अवलंबन कमी करता येईल. चीनी कंपन्यांनी बनवलेल्या उपकरणांचे नेटवर्क सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. चीनच्या कंपन्यांना रोखण्यासाठी नवीन टेंडर काढण्यात येतील.