बॉलिवूडच्या कलाकारांनी वाहिली कादर खान यांना श्रद्धांजली !

मुंबई : वृत्तसंस्था – ज्‍येष्‍ठ अभिनेते कादर खान यांच्‍यावर काही दिवसांपासून कॅनडामध्‍ये उपचार सुरू होते. उपचारावेळी त्‍यांनी अखेरचा श्वास घेतला. कादर खान हे ८१ वर्षांचे होते. त्‍यांच्‍या निधनाचे वृत्त समजताच बॉलिवूडमध्‍ये शोककळा पसरली आहे. अभिनेते अमिताभ बच्‍चन, अनुपम खेर, प्रसिध्‍द गायिका लता मंगेशकर, अभिनेता अर्जुन कपूरसह बॉलिवूडमधील अनेक दिग्‍गज कलाकारांनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून शोक व्‍यक्‍त केला आहे. अनुपम खेर यांनी ट्‍विटरवर व्‍हिडिओ शेअर केला आहे.

 

या आजाराने त्रस्त होते कादर खान
कादर खान हे  प्रोग्रेसिव सुपरन्यूक्लियर पाल्सी नावाच्या गंभीर आजाराने ग्रासले होते. या आजाराने व्यक्तीचं शारीरिक संतुलन बिघडतं. त्यामुळे या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला बसताना, उठताना, चालताना किंवा बोलताना त्रास होतो. त्याचबरोबर या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होतो आणि कालांतराने ती व्यक्ती छोट्या गोष्टी विसरू लागते. या आजाराने ग्रस्त असलेल्या कादर खान यांनाही या सर्व समस्यांचा सामना करावा लागत होता. अनेकदा ते छोट्या छोट्या गोष्टी विसरतं असतं. तर अनेकदा माणसांना ओळखणंही त्यांना शक्य होत नसे.कादर खान यांनी आपल्‍या ४३ वर्षांच्‍या सिनेकरिअरमध्‍ये जवळपास ३०० हून अधिक चित्रपटात अभिनय आणि २५० हून अधिक चित्रपटात संवाद लिहिले आहेत. कादर खान यांनी ‘दिमाग का दही’ (२०१५) या शेवटच्‍या चित्रपटात काम केले होते.