‘एबीसीडी-3’ मध्ये कॅटरीनाऐवजी दिसणार ‘ही’ अभिनेत्री

मुंबई : वृत्तसंस्था – ‘एबीसीडी-3’ या रेमो डिसुजाच्या आगामी चित्रपटात आता अभिनेत्री श्रद्धा कपूरच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याआधी ही भूमिका अभिनेत्री कॅटरीना कैफ साकारणार होती परंतु आगामी चित्रपट भारतमध्येही ती भूमिका साकारणार आहे. भारत आणि ‘एबीसीडी-3’ च्या तारखा सोबतच येत असल्याने तिने एबीसीडी-3’ मधून एक्झिट घेतली आहे. यानंतर आता ही भूमिका श्रद्धा कपूर साकारणार असल्याचे समजत आहे.

कॅटरिनासारखी उत्तम नर्तकी यामध्ये असणे ही काही नवलाईची बाब ठरणार नव्हतीच. या चित्रपटात श्रद्धा पुन्हा एकदा वरुण धवन समवेत दिसणार आहे. ‘एबीसीडी-2’ मध्येही श्रद्धाच प्रमुख भूमिकेत होती. चालू महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती. परंतु कॅटरिनाने चित्रीकरणाआधीच रेमोला आपला नकार कळवला. तिच्या जागी आलेल्या श्रद्धाला आता एकाच वेळी बॅडमिंटन आणि नृत्य अशी कसरत करावी लागणार आहे !

श्रद्धा कपूरने ‘तीन पत्ती’ मधून आगमन केले, त्यावेळीच तिच्यामधील स्पार्क अनेकांना दिसला होता. ‘आशिकी-2’ ने तिला पहिले यश दिले आणि तिला मागे वळून पाहावे लागले नाही. सौंदर्य, अभिनय आणि नृत्य अशा सर्वच बाबतीत तिने स्वतःला सिद्ध केले व अनेक हिट चित्रपट दिले. अलीकडेच तिचा ‘स्त्री’ चांगलाच गाजला. सध्या ती ‘फुलराणी’ सायना नेहवालच्या जीवनावर आधारित चित्रपटात तिची भूमिका करीत आहे. आता ‘एबीसीडी-3’ या रेमो डिसुजाच्या आगामी चित्रपटातही ती प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.