जामा मशिदीच्या पायऱ्याखाली देवी देवतांच्या मूर्ती

लखनौ : वृत्तसंस्था – जामा मशिदीच्या पायऱ्यांखाली देवी-देवतांच्या मूर्ती आहे. काशी, अयोध्या सोडा आधी दिल्लीतील जामा मशीद पाडा. तेथे मूर्ती न निघाल्यास मला फाशी द्या, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असताना भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
साक्षी महाराज उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करत होते. त्यावेळी ते म्हणाले की, सर्वात आधी दिल्लीतील जामा मशीद तोडायला पाहिजे. कारण हिंदू मंदिर तोडून तिथे मशीद बांधण्यात आली आहे. मथुरा, काशी, अयोध्या सोडा जामा मशिद तोडा, अशी घोषणा मी राजकारणात आलो तेव्हाच दिली होती. हिंदूंच्या भावना दुखवण्यासाठी मुघलांनी भारतातील मंदिरे तोडून तेथे ३ हजार मशिदी बांधल्या होत्या, असे साक्षी महाराज म्हणाले. तसेच जामा मशिदीच्या पायऱ्या तोडल्यास त्यातून देवी-देवतांच्या मूर्ती निघतील असा दावा त्यांनी केला. मूर्ती न निघाल्यास मला फासावर लटकवा, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दिल्लीतील जामा मशीद ही भारतातील सर्वात मोठी मशीद आहे. या मशिदीचं बांधकाम १६४४ ते १६५६ च्या दरम्यान मुघल सम्राट शाहजहान याने केले होते. नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या साक्षी महाराजांनी राम मंदिराचा मुद्दा तापलेला असताना जामा मशिदीच्या नवीन वादाला तोंड फोडले आहे.

मोदींच्या सभेला यायला तयार नसतील तर साड्या, दारू, पैसे वाटा