सावरकरांच्या पुतळ्यावरुन दिल्ली विद्यापीठात’जुंपली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये कला शाखेच्या गेटजवळ विनापरवानगी वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि भगत सिंग यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने लावलेल्या या पुतळ्यावर कॉंग्रेसच्या नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाने (एनएसयुआय) टिका केली आहे. शिवाय ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनेही अभाविपच्या या कृतीवर संताप व्यक्त केला आहे.

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढील महिन्यात होत असून १२ सप्टेंबर रोजी मतदान आहे. त्यामुळे विद्यापीठात विद्यार्थी परिषद निवडणुकांआधी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. अभाविपचे नेतृत्व करताना छात्रसंघाचे अध्यक्ष शक्ती सिंह म्हणाले की, “पुतळे उभारण्यासाठी विद्यापीठाकडे अनेकदा परवानगी मागितली होती. पण विद्यापीठाकडून कोणतेही उत्तर आले नाही. नाईलाजाने आम्ही हे पुतळे उभारले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने हे पुतळे हटविल्यास आमच्या विरोधाला सामोरे जावे लागेल.”

एनएसयुआय दिल्लीचे अध्यक्ष अक्षय लाकरा यांनी सावरकरांचा पुतळा भगत सिंग आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत ठेवणे योग्य नाही असे सांगितले. तसेच चोवीस तासात हे पुतळे हटविले नाही तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ‘आयसा’चे दिल्लीचे अध्यक्ष कवलप्रीत कौर यांनी लाकरा यांचे समर्थन केले. ते म्हणाले, भगत सिंह आणि सुभाष चंद्रांच्या आड सावरकरांच्या विचारांना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. तो कधीच स्वीकारला जाणार नाही. ज्या जागी पुतळे उभारले आहेत, ती जागा सार्वजनिक आहे. उत्तर दिल्ली महापालिकेच्या अधिकार क्षेत्रात ती जागा येते. दरम्यान विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

आरोग्यविषयक वृत्त –