6 हजाराची लाच स्विकारताना महावितरणचा सहाय्यक अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

वसई : पोलीसनामा ऑनलाइन – मीटर रिडींगचे रिडक्शन लोड कमी करण्यासाठी 6 हजार रुपयांची लाच स्विकारताना महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यास पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगहाथ पकडले. ही कारवाई आज (गुरुवार) दुपारी वालीव येथे केली. कश्यप मनोहर शेंडे असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी महावितरणच्या ठेकेदाराने पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी (दि.20) तक्रार दिली होती.

मीटर रिडींगचे रिडक्शन लोड कमी करण्यासाठी महावितरण कंपनीचा तक्रारदार ठेकेदार यांच्याकडे वीज ग्राहकाने मीटर रिडींगबाबत रिडक्शन लोड कमी करण्यासाठी अर्ज केला होता. तक्रारदार यांचे काम करून देण्यासाठी शेंडे याने बुधवारी 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ग्राहकाच्या वतीने महावितरणच्या एजंट ठेकेदाराने पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता शेंडे याने वालीव येथे लाच स्विकारण्याचे कबुल केले. लाचलुचपत अधिकाऱ्यांनी वालीव येथे सापळा रचला. एका कारमध्ये लाचेची रक्कम स्विकारताना शेंडे याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई ठाणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मकुंद हातोटे, पोलीस उपअधीक्षक के. हेगाजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, पोलीस हवालदार कदम, मदने, पोलीस नाईक सुवारे, पालवे, सुमडा , मांजरेकर, चालक दोडे यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : Policenama.com