3600 रुपयाची लाच घेताना तहसील कार्यालयातील कारकून अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – नवीन रेशन कार्ड काढून देण्यासाठी बोदवड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकुनाला 3600 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (मंगळवार) दुपारी बोदवड तहसील कार्यालयात करण्यात आली. या करवाईमुळे तहसील कार्यालयात खळबळ उडाली असून लाचखोर कारकुनाविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय देविदास पाटील (वय-41 रा. देवपुर, ता. जि. धुळे) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अव्वल कारकुनाचे नाव आहे. याप्रकरणी बोदवड तालुक्यातील 48 वर्षीय व्यक्तीने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आज (मंगळवार) सकाळी तक्रार केली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार हे स्वस्त धान्य दुकान चावत असून त्यांच्या गावातील त्यांच्या स्वस्त धान्य दुकानात तिघांनी नवीन रेशन कार्ड काढून देण्याची मागणी केली. तीन नवीन इसमांचे रेसन कार्ड बनवून देण्यासाठी संजय पाटील याने प्रत्येकी 1200 या प्रमाणे 3600 रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पंचासमक्ष पडताळणी केली असता संजय पाटील याने 3600 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयात सापळा रचून संजय पाटील याला तक्रारदाराकडून लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक जी.एम. ठाकुर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, संजय बच्छाव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक अहीरे, पोलीस नाईक मनोज जोशी, जनार्दन चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/