25000 लाच घेताना शासकीय कंत्राटदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – बीएसएनएल कार्यालयात कंत्राटी पद्धतीने कामावर लावण्यासाठी 25 हजार रुपयाची लाच घेताना शासकीय कंत्राटदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई जळगाव येथील बीएसएनएल कार्यालयात आज (गुरुवार) करण्यात आली. सुभाष कोंडाजीराव पवार (वय-50, रा. प्लॅट नं.15, गणपती रेसीडेंसी, गणपती नगर, जळगाव) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या शासकीय कंत्राटदाराचे नाव आहे.

याप्रकरणी जळगाव येथील 33 वर्षीय व्यक्तीने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार यांना रावेर येथील बीएसएनएल कार्यालयात कंत्राटी पद्धतीने कामावर लावण्यासाठी सुभाष पवार या शासकीय कंत्राटदाराने 25 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याप्रकरणी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता आज जळगाव येथील बीएसएनएलच्या कार्यालयात लाच स्विकारण्याचे पवार याने कबुल केले. त्यानुसार पथकाने कार्यालयात सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव, सहायक फौजदार रविंद्र माळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक अहीरे, सुरेश पाटील, सुनिल पाटील, पोलीस नाईक मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, नासिर देशमुख, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/