20000 रुपयाची लाच घेताना महापालिकेतील उपनिबंधक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – जन्माचा दाखला देण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेतील उपनिबंधकास 20 हजार रुपयाची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई महापालिकेत आज (शुक्रवार) दुपारी दोनच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे. नितीन मानसिंग राठोड (वय-49 रा. बी/108, बिल्डिंग नंबर 2, वज्रेश्वरी कॉम्पलेक्स, विरार (पू)) असे रंगेहाथ पकण्यात आलेल्या उपनिबंधकाचे नाव आहे.

याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. नितीन राठोड हा मिरा-भाईंदर महापालिकेत लिपीक असून त्याच्याकडे उपनिबंधकाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या जन्माचा दाखला मिळावा यासाठी महापालिकेत अर्ज केला आहे. तक्रारदारांना जन्माचा दाखला दोन महिन्याच्या आत देण्यासाठी राठोड याने तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांनी गुरुवारी (दि.2) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी करून आज दुपारी दोनच्या सुमारास महापालिकेत सापळा रचला. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपयाची लाच स्विकारताना नितीन राठोड याला रंगेहाथ पकडण्यात आला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रजापती आणि त्याच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/