वाढीव पोलीस कोठडी न मागण्यासाठी 1 लाखांची लाच; सहाय्यक पोलीस निरीक्षकासह (API) तिघांवर गुन्हा दाखल

सांगली : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका संशयितास गुन्ह्याच्या कामात सहकार्य करणे व वाढीव पोलीस कस्टडी न मागण्यासाठी १ लाख रुपयांची लाचेची मागणी करताना पोलीस काँस्टेबलसह एका खासगी व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले. यातील प्रमुख विटा पोलीस ठाण्याचा सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे हा फरार झाला आहे. पोलीस काँस्टेबल विवेक यादव व खासगी व्यक्ती अकीब फिरोज तांबोळी यांना अटक केली आहे.

विटा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल एकाविरुद्ध गुन्हा दाखल असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे याच्याकडे होता. या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी व वाढीव पोलीस कस्टडी न मागण्यासाठी झालटे व पोलीस काँस्टेबल यादव या दोघांनी संशयिताच्या दिवाणजीकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. दिवाणजीने सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी करताना त्यांनी तडजोड करीत १ लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने विटा पोलीस ठाण्यात सापळा रचला. सहायक निरीक्षक प्रदीप झालटे, काँस्टेबल विवेक यादव यांनी तक्रारदार यांच्याकडे दीड लाखांची मागणी केली. तसेच विवेक यादव याच्या सांगण्यावरुन खासगी व्यक्ती अकीब तांबोळी याने तक्रारदाराकडून १ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. मात्र, हे समजताच प्रदीप झालटे हा फरार झाला आहे.