मुंबई : ACB ची मोठी कारवाई ! आरे दूध डेअरीचा CEO च्या घरातून तब्बल 3.46 कोटीची रोकड जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – घराच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या आरे दुग्ध डेअरीचा सीईओच्या घरातून तब्बल 3 कोटी 46 लाखांची रोकड जप्त केली आहे. या बेकायदा जमविलेल्या रकमेबाबत एसीबी अधिक तपास करत आहे.

नथू विठ्ठल राठोड (42) असे एसीबीने अटक केलेल्या लाचखोर अधिका-याचे नाव आहे. राठोड याच्याकडे गोरेगाव दुग्ध वसाहत तथा उपायुक्त प्रशासन याचा अतिरिक्त कार्यभार आहे. आरोपी राठोड हा 2016 पासून आरेमध्येच कार्यरत होता. नियमानुसार 3 वर्षांनी बदली होणे अपेक्षित असतानाही त्याला अभय मिळत असल्याचे एका अधिका-याने सांगितले.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने घर दुरुस्तीसाठी राठोड याच्याकडे अर्ज केला होता. तेंव्हा राठोड याने शिपाई अरविंद तिवारी यास भेटण्यास सांगितले. तिवारीने अर्जदाराकडे 50 हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. सोमवारी एसीबीने सापळा रचून तिवारीला रंगेहाथ पकडले. यात राठोडचा सहभाग स्पष्ट होताच, दोघांनाही अटक केली आहे. त्यानंतर एसीबीने राठोड याच्या घरी झाडाझडती घेतली. त्याच्या घरात 3 कोटी 46 लाखांची रोकड आढळली आहे. 14 मेपासून राठोड एसीबीच्या रडारवर होता. त्याने लाच मागितल्याचे स्पष्ट होताच, 24 मे रोजी एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांनी पैसे देण्याची तयारी दाखवताच राठोडने तक्रारदाराला गोरेगाव दुग्ध डेअरी येथील कार्यालयात तिवारीला भेटायला सांगितले. त्या वेळी लाचेची रक्कम स्वीकारण्यात आली.