Corona Side Effects : रिसर्चमध्ये दावा – कोरोनातून बरे झालेल्या 14% रूग्णांना होत आहेत नवीन आजार

लंडन : चीनमधून संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गातून रूग्ण बरे होत असले तरी अनेकांना विविध प्रकारच्या नवीन आजारांचा धोका कायम राहात आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित एका संशोधनात दावा करण्यात आला आहे की, कोविड-19 संसर्ग जाता-जाता सुद्धा अनेक आरोग्य समस्या मागे सोडून जातो. संशोधनानुसार, कोरोनाने संक्रमित 14 टक्के रूग्णांच्या शरीराला कोरोना अशाप्रकारे प्रभावित करत आहे की, त्यांना पुन्हा हॉस्पिटलकडे जावे लागत आहे.

लंडन येथील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ रिसर्चच्या संशोधकांनी मागच्या वर्षी 1 जानेवारीपासून 31 ऑक्टोबरच्या दरम्यान कोरोनाने संक्रमित होणार्‍या 1,93,113 रूग्णांच्या आरोग्याचा अभ्यास केला. या संशोधनात 18 ते 65 वर्ष वयाच्या रूग्णांचा समावेश करण्यात आला होता. या रूग्णांच्या कोरोनाने संक्रमित झाल्यानंतर 21 दिवसांपर्यंत त्यांच्या शरीरात होणार्‍या बदलांवर लक्ष ठेवले. संशोधकांनी नॅशनल क्लेम्स डाटाचे विश्लेषण करून या गोष्टीचा शोध घेतला की, व्हायरसला मात दिल्यानंतर सहा महिन्यांच्या आत या रूग्णांनी कोणत्या तरी नवीन आजारांचा सामना केला आहे.

फंगसचा हल्ला
संशोधनातून मिळालेल्या आकड्यांची तुलना अशा रूग्णांशी केली जे कोरोनाने कधी संक्रमित झाले नव्हते. संशोधकांना आढळले की, कोरोना होणार्‍या 14 टक्के रूग्णांमध्ये किमान एक नवीन आरोग्य समस्या दिसून आली. या आरोग्य समस्यांमुळे रूग्णांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा जावे लागले. निरोगी लोकांच्या तुलनेत कोविड-19 वर मात करणार्‍या रूग्णांचा कोणत्या ना कोणत्या आजारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा दर सुद्धा पाच टक्के जास्त आढळून आला आहे.

तरूणांमध्ये धोका सर्वात जास्त
मुख्य संशोधक डॉक्टर इलेन मॅक्सवेल यांनी सांगितले की, तरूणांमध्ये कोरोनातून बरे झाल्यानंतर सुद्धा आजाराचा धोका जास्त दिसून आला आहे. त्यांनी म्हटले की, ज्येष्ठ आणि आजारी रूग्णांची तुलना केली तर नवीन आजाराने तरूण जास्त प्रभावित दिसत आहेत. यामध्ये ते रूग्ण सुद्धा सहभागी आहेत, ज्यांना अगोदर कधीही आरोग्यसंबंधी कोणताही त्रास झाला नव्हता.