Pimpri : कोरोना चाचणीशिवाय रुग्णालयाचा उपचारास नकार, सायकलपटू कमलाकर झेंडे यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  आधी कोरोना चाचणीचा रिपोर्ट आणा मग उपचाराच बघू, म्हणत रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिल्याने पिंपरी- चिंचवड शहरातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडापटू, माजी सायकलपटू कमलाकर सोनबा झेंडे यांचे निधन झाले आहे. दरम्यान कमलाकर यांचा मुलगा प्रशांतने वडिलांच्या निधनाचे खापर अक्षम्य आरोग्य यंत्रणेवर फोडले आहे. वडिलांचे निधन अपूऱ्या उपचाराअभावी झाले आहे. दोन रुग्णालयांनी त्यांना दाखल केले नाही. तिसऱ्यांनी योग्य उपचार दिले नाही. प्रत्येकजण कोव्हिड रिपोर्ट मागत होते. रिपोर्टचा हट्ट धरण्याआधी रुग्णालयांनी प्राथमिक उपचार केले असते. तर माझे वडिल वाचले असते, असे त्यांनी म्हटले आहे.

कमलाकर झेंडे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांची तब्बेत खालवल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पहिल्या रुग्णालयाने म्हटले की, तुम्ही त्यांची आधी कोरोनाची चाचणी करा. त्यावेळी रात्रीचे अकरा वाजल्याने कुठे टेस्ट करणार ? असा प्रश्न कुटूंबियांना पडला. त्यानंतर डी.वाय.पाटील रुग्णालयात घेऊन गेले तिथल्या डॉक्टरांनी कोव्हिड रिपोर्टशिवाय दाखल करून घेता येत नाही, असे म्हटल्याचे प्रशांतने सांगितले. त्यानंतर रात्री 1 वाजता पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांनी वडिलांना दाखल करून घेतले. त्यांना ऑक्सिजन सपोर्ट दिला. परंतू म्हटले की, कोव्हिड टेस्ट रिपोर्टनुसार सकाळी उपचार सुर करू. त्यानंतर पहाटे 3 च्या सुमारास प्रशांत यांना रुग्णालयातून फोन आला. त्यांनी सांगितले की, तुमच्या वडीलांची तब्बेत खालावली असून त्यांना परत न्या किंवा इतर रुग्णालयात दाखल करा. प्रशांत यांनी तत्काळ ओळखीच्या माजी नगरसेवकाला फोन केला. त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी बातचीत केली. त्यानंतर रुग्णालयाने त्यांना तेथेच ठेवत काळजी आणि उपचार देण्याचे आश्वासन दिले.

सकाळी कुटूंबीय त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेले. त्यावेळी त्यांची प्रकृती ठिक होती. परंतु अचानक त्यांची हालचाल बंद झाली. कुटूंबियांनी डॉक्टरांना याची माहिती दिली. तोपर्यंत कमलाकर यांनी प्राण सोडला होता. दरम्यान कमलाकर यांना रुग्णालयांनी नक्की कोणत्या कारणास्तव दाखल करून घेण्यास नकरा दिला याबाबत चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तर डी. वाय़.पाटील रुग्णालय प्रशासनानेही कुटूंबाच्या आरोपांची चौकशी करू असे म्हटले आहे. याबाबतचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.