सचिन वाझेंना अटक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले – ‘ही तर केवळ सुरूवात, पुढे-पुढे…’

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. दरम्यान वाझेंवरील कारवाईसाठी विधानसभेत आवाज उठवणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. वाझेंवरील कारवाई ही केवळ सुरुवात असून या प्रकरणात अजून माहिती समोर येण्याची शक्यता फडणवीस यांनी वर्तवली आहे. तसेच खरंतर हा या प्रकरणाचा एकच भाग असून दुसरा भाग आणखी समोर यायचा असल्याचेही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, हे प्रकरण गंभीर असून याचे मला जेंव्हा पुरावे मिळाले तेंव्हा मी ते सभागृहात मांडले. राज्यात सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीसच असे वागत असतील तर कायदा आणि सुव्यवस्था कशी राहील असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात वाझेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून झाला. मुख्यमंत्र्यांनी वाझे हा लादेन आहे का असा प्रतिप्रश्न करत वकिली करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकरणी एनआयएला अनेक पुरावे मिळाले आहेत. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणातही पुरावे अन् धागेदोरे एनआयएला मिळाले आहेत. वाझेवरील कारवाई ही केवळ सुरुवात असून यात कुणाची काय भूमिका आहे, हे देखील समोर येणे गरजेचे असल्याचेही फडणवीस म्हणाले. दरम्यान अटक केलेल्या वाझेंना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.